सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे पहायला मिळतात. जिल्ह्यात गड, किल्ले असले तरी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्रे हि अजूनही साताऱ्यात जपून ठेवण्यात आलेली आहेत. सातारा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नव्या वास्तूचे नुकतेच बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी शिवकालीन आणि शिवपूर्वकालीन तसेच पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन शस्त्र संग्रहित करण्यात आले असून तब्बल 140 शस्त्रांचा जणू खजिनाच या ठिकाणी पहायला मिळत आहे.
सातारा येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेला १४० शस्त्रांचा साठा हा नक्की आला कुठून? या ठिकाणी असलेली शस्त्रे कोणी जपून ठेवली होती? त्याबाबत सांगायचे झाले तर ती शस्त्रे जयसिंगपूर येथील दिवंगत शस्त्रसंग्रहक गिरीश जाधव यांनी एकत्रित केली होती. त्यांनी आयुष्यभर संपूर्ण महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यांतून फिरून, स्वतःच्या खिशातून पदरमोड करत शिवकालीन अनेक शस्त्रांचा साठा जतन केला.
त्यांनी साठवलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्रांपैकी काही तलवारी, कट्यारी, ढाली, दांडपट्टे, कुऱ्हाडी, भाले अशा एकूण 140 शस्त्रांचा खजिना श्री. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे कोल्हापूर येथे सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे सातारच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आणखी शिवकालीन शस्त्र आणि अस्त्रांची भर पडली आहे. येथील संग्रहालयात येणाऱ्या सर्व पर्यटकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला या ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
शिवकालीन तलवारी, खंजीर, चिलखते अन् बरेच काही…
छत्रपती शिवाजी संग्रहालयात शिवकालीन तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्नाने, चिलखते, तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, गुप्तीचे प्रकार, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारूच्या पुड्याचा शिंगाडा, संगिनी, पिस्तुले अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान विविध प्रकारच्या पगड्या, शैला यासह छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ संग्रहालयात पहावयास मिळणार आहे.