सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या आवारात लागलेली हातगाड्यांची रांग हळूहळू कमी होऊ लागली आहे. पालिकेने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोमवारी दुपारी येथील 10 विक्रेत्यांकडून आपल्या हातगाड्या स्वत:हून हटविण्यात आल्या. उर्वरित हातगाड्या हटविण्यासाठी हाॅकर्स संघटनेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल; परंतु पालिकेने विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे दहा महिन्यांसाठी साताऱ्यातील संग्रहालयात ठेवली जाणार आहे. काही दिवसांत ही वाघनखे लंडनहून साताऱ्यात येतील, असे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाघनखे व संग्रहालयाच्या सुरक्षिततेत कोणतीही उणीव भासू नये, याची जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या विविध विभागांच्या बैठकीत संग्रहालयाच्या आवारातील हातगाड्या, टपऱ्या हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सर्व विक्रेत्यांना हातगाड्या हटविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सहकार्य न केल्यास संबंधित हातगाड्या पोलिस बंदोबस्तात हटविल्या जातील, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आठ दिवसांत एकाही विक्रेत्याकडून हातगाडी हटविण्यात आली नाही. शिवाय काही राजकीय मंडळींकडून कारवाई न करण्याबाबत पालिकेच्या पथकावर दबावही आणला गेला. मात्र, सर्व विरोध झुगारुन पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक सोमवारी दुपारी यंत्रणेसह घटनास्थळी आले. यावेळी हातगाडीधारकांनी सहकार्याची भूमीका दाखवत दहा हातगाड्या स्वत:हून हटविल्या.