कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात सध्या शेतशीवारत सध्या ऊसतोड सुरू आहे. मात्र, ऊसतोड सुरू असताना काही टोळीतील मुकादमांकडून फसवणूक केल्याची देखील घटना घडत आहे. अशीच घटना कराड तालुक्यात घडली असून “ऊसतोड मजुराच्या १२ जोड्या देतो,” असे सांगुण ट्रॅक्टर मालकांचा १० लाख २५ हजार रुपयांची फसवणुक केली आहे. या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील २ ऊसतोड मजुर टोळी मुकादमांवर कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश सरदार भिल्ल-पावरा (वय ३७, रा. कात्रा राजवाडी, अकरणी-नंदुरबार) व दोन्ह्या माध्या पावरा (रा. तेलखेडी मांडवी बु. अकरणी, नंदुरबार) अशी गुन्हा दाखल झालेल्या मुकादमांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल रघुनाथ ताटे (रा. तांबवे, ता. कराड) यांचे दोन ट्रॅक्टर असल्याने त्यांना ऊसतोड हंगामात साखर कारखान्यांना ऊस तोडीसाठी मजुर हवे होते. त्यांची भेट रमेश भिल्ल-पावरा व दोन्ह्या पावरा या दोघांशी झाली. या दोघांनी आम्ही मजुर देतो असे राहुल यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ताटे यांच्याकडून दोघांच्या नावावर अधून मधून रोख, एनईएफटी, गुगल पे व ऑनलाईन १० लाख २५ हजार रुपये घेतले. त्यांनी मजुर पाठवण्यासाठी करारही करुन ताटे यांना मजुर लवकरच येतील असे सांगितले.
मात्र, काही दिवस झाले तरी ऊसतोड मजुर काही आले नसल्याने ताटे संबंधित दोन मुकादमांकडे कधी मजुर येतील, अशी वारंवार विचारणा करू लागले. मात्र, त्यांनी मजुर पाठवले नाहीत. त्याचबरोबर संबंधित दोन मुकादमांनी फोनही उचलणे बंद केले. त्यामुळे ताटे यांच्या त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर ताटे यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात संबंधित दोन मुकादमांविरोधात १० लाख २५ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.