सातारा प्रतिनिधी | पाल, ता. कराड येथे श्री खंडोबा देवाची यात्रा दि. २० ते दि.२८ जानेवारी २०२४ या कालावधीत भरणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून विविध ठिकाणाहून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच एस टी बसने येत असतात. यामुळे पाल गावात व उंब्रज शहरात मोठया प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असते. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (१)(ब) प्रमाणे पाल परिसरातील रस्त्यावरील वाहतूकी संबंधीचे आदेश २० ते दि. २८ जानेवारी पर्यंत जारी केले आहे.
काशिळ ते पाल रोडने येणारी सर्व वाहने आदर्शनगर गावाजवळील तात्पुरते एस. टी. स्टॅन्ड समोर थांबवतील व त्याच्या समोरील शेतात पाकींगची व्यवस्था केली आहे तेथे वाहने पार्क करावीत. हरपळवाडी ते पाल येणारी सर्व वाहने ही इमरसन कंपनीजवळ थांबवावीत. तेथील शेतात वाहने पार्क करावीत. तारळे – पाल येणारी सर्व वाहने ही तारळे रोडला पाल ग्रामपंचायतीचे नर्सरी समोर रोडवर थांबवावीत व तेथे पार्क करावीत.
मरळी ते पाल येणारी सर्व वाहने खंडोबा कारखान्यासमोर श्रीकांत शेजवळ यांच्या शेताचे समोर थांबवावीत व त्यांचे शेतात केलेल्या पार्कींगमध्ये पार्क करावीत. वडगांव ते पाल हा सर्व रोड आपत्तकालीन रोड असून त्या रोडवर येणाऱ्या सर्व वाहनांना व वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे. वडगाव ते इंदोली फाटा जाणाऱ्या रस्त्याशेजारी जाग्यवर पार्कींग करीता बंदी घालण्यात येत आहे. दि. 20 रोजीच्या रात्री 10 ते दि. 22 जानेवारी रोजी रात्री 10 वा. पर्यंत पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.