सेवागिरी महारांजाच्या यात्रा कालावधीत ‘अशी’ राहणार वाहतूक सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांची यात्रा दि. 10 जानेवारी रोजी होणार आहे. श्री. सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त सातारा जिल्हा तसेच राज्यातुन मोठया प्रमाणात भाविक येतात. दरम्यान, यात्रेदिवशी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दि. 6 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 रोजीपर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. दि. 10 जानेवारी रोजी रथ मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक बदल करण्यात आला आहे.

सातारा ते दहिवडीकडे जाणारी वाहने पुसेगावात न जाता नेर, ललगुन, बुध राजापुर, कुळकजाई मार्गे दहिवडीकडे जातील व दहिवडीकडून येणारी वाहणे पिंगळी – वडूज, चौकीचा आंबा, औंधफाटा मार्गे सातारा किंवा कटगुण,खातगुण,खटाव जाखणगाव मार्गे औंध फाटयावरून साताराकडे सोडली जाणार आहे. तसेच वडूजकडून फलटणकडे जाणारी वाहणे पुसेगावात न जाता खटाव, जाखणगाव, औंधफाटा ते नेर-ललगुन मार्गे फलटणला जातील. तसेच फलटणकडून वडूजकडे जाणारी वाहणे ललगुन,नेर,औंध फाटा,खटाव,चौकीचा आंबा मार्गे वडूजकडे जातील.

दि. 6 जानेवरी रोजी रात्री 00.01 ते 16 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत शिवाजी चौक पुसेगाव ते दहिवडीकडे, वडूज, फलटण, साताराकडे चौकापासून चारही बाजुस 200 मीटर आंतरापर्यंत मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाई करण्यात येईल.पर्यायी मार्गाचा वापर करून पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.