सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील जमीन घोटाळ्याच्या सुनावणीला अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी कुटुंबासह सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. परंतु, ज्यांच्या समोर सुनावणी होती, ते अप्पर जिल्हाधिकारीच मंत्रालयातील बैठकीला गेले असल्याने बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही. आता गुरुवार, दि ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी आपण प्रशासनास सहकार्य करू, अशा मोजक्या शब्दात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या झाडाणी गावची संपूर्ण 640 एकर जमीन शेतकऱ्यांना फसवून अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावे खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. प्रकरणी सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीसा काढल्या होत्या. त्यानुसार चंद्रकांत वळवी, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीला हजर झाले होते.
सुनावणीस उपस्थित राहण्याचे दिले होते समज
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात अव्वल कारकून जयंत वीर यांनी याप्रकरणी उपस्थित असलेल्या सर्वांची हजेरी लावली. तसेच अप्पर जिल्हाधिकारी हे मुंबईत महसूल मंत्र्यांबरोबरील बैठकीला गेले असल्याने पुढील सुनावणीसाठी 11 जुलै रोजीची तारीख दिली. त्या दिवशी सर्वांनी उपस्थित राहण्याची समजही संबंधितांना दिली. पुढील सुनावणीवेळी म्हणणे मांडण्यासही सांगितले.
मागील तारखेच्या वेळी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे वकीलपत्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले होते. तसेच त्यांच्या विरोधात तक्रारी असल्याने त्यांना समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजच्या तारखेला सर्वजण हजर राहिले. चंद्रकांत वळवी व त्यांच्या पत्नी, पीयुष बोंगीरवार व त्यांच्या पत्नी, अनिल वसावे व त्यांच्या पत्नी, तसेच तक्रारदार सुशांत मोरे आणि अन्य एक, असे ८ जण उपस्थित होते.
जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळविंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातून बाहेर पडल्यानंतर जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी माध्यमांशी बोलताना सरकारी प्रक्रियेचे पूर्णपणे मी पालन करणार असून शासनाला चौकशीकामी सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, तक्रारदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले की, गुरुवार दि. 11 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी प्रत्येकाला त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.