मतदान केंद्र बदलांबाबतची माहिती मतदारांपर्यंत तत्काळ पोहचवा; मतदार यादी निरीक्षक चंद्रकांत पुलकुंडवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । एकही पात्र उमेदवारांची नावे वगळले जाणार नाहीत. तसेच पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक आयोग व प्रशासन प्रयत्न करीत आहे. सातारा जिल्ह्यात 147 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून 107 मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल आहे. 83 मतदान केंद्रांच्या नावात बदल आहे. तर 73 मतदान केंद्रांचे विलणीकरणाचा प्रस्ताव आहे. 1 मतदान केंद्र रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 3 हजार 165 मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांसंबधी झालेला बदलाची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मदत करावी तसेच याची माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

मतदार यादी संदर्भात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत विभागीय आयुक्त पुणे तथा मतदार यादी निरीक्षक यांनी सातारा जिल्ह्यास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपायुक्त निलीमा धायगुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रातांधिकारी सुधाकर भोसले, नायब तहसीलदार अनिल जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये. 18 वर्ष पूर्ण केलेल्या नव मतदारांची नोंदणी निश्चितपणे होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले. नावे चुकली असल्यास, नोंदणी राहिली असल्यास, नावे वगळली गेली असल्यास सर्व मतदारांनी याबाबत खात्री करुन घ्यावी. सर्व यंत्रणेने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार समन्वय ठेवून निवडणुकीचे कामकाज करावे.

नवीन मतदान केंद्रे निर्मितीमध्ये सातारा जिल्हा आघाडीवर असून मतदार यादीतून मयत मतदारांचीनावे खात्री करुन वगळली जातील. बोगस नव मतदारांची नोंदणी झाल्याचे निदर्शन आल्यास गुन्हे दाखल केले जातील. विहित कागदपत्रांच्या आधारे आक्षेप केले गेले असल्यास त्यांची छाननी करुन निर्णय घेण्यात येईल. व 30 ऑगस्ट रोजी आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांची आढावा बैठक

या बैठकीनंतर सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची आढावा बैठक विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी आढावा सादर केला. सातारा जिल्ह्यात 8 विधानसभा मतदार संघ असून 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 25 लाख 88 हजार 219 मतदारांची नोंदणी आहे. यामध्ये 13 लाख 16 हजार 963 पुरुष, 12 लाख 71 हजार 153 महिला तर 103 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी आहे. जिल्ह्यात 20 हजार 147 दिव्यांग, 37 हजार 476 मतदार 85 वर्षावरील आहेत. 18 ते 19 वर्ष वयोगटातील 52 हजार 865 मतदार आहेत. नव मतदारांच्या नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात अव्वल आहे.

2 लाख 5 हजार 828 मतदारांची नव्याने नोंदणी

गेल्या दोन वर्षात 2 लाख 5 हजार 828 मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे तर 1 लाख 79 हजार 166 मतदारांची नावे विविध कारणांनी वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात 3 हजार 165 मतदान केंद्रे आहेत. मतदान जनजागृतीसाठी विविधस्तरांवरुन व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत.