सातारा प्रतिनिधी । सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सातारला शनिवारी आले होते. यावेळी त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेजला भेट दिली यावेळी त्यांनी महायुतीतील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे कराड उत्तर मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, उपाध्यक्ष धनंजय जांभळे, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले की, सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेज बांधकामाचा सुमारे १२५ कोटींचे बिल थकीत आहे. हिवाळी अधिवेशनात ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही महिनाभरात होईल. त्यानंतर प्रलंबीत बिलांचा विषय राहणार नाही.
आनंदराव पाटलांनी घेतली चंद्रकांतदादांची भेट
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एकेकाळी निष्ठावंत सहकारी असलेले पण सध्या अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्या माजी आनंदराव पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जाऊ लागल्या आहेत.