निवडणूक कर्तव्यावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना चक्रीका ॲप बंधनकारक : निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे

0
26
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी होत आहे. सदर निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नियुक्त सर्व निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना चक्रिका ॲप  डाउनलोड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज सेक्टर ऑफिसर्स यांच्या प्रशिक्षणावेळी दिली.

यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, आचारसंहिता सहा.निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, प्रताप कोळी, एस एस पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे लोकेशन कळावे यासाठी मोबाईलमध्ये चक्रीका ॲप डाऊनलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चक्रिका ॲप मतदानाच्या आदल्या दिवशी १९ नोव्हेंबरला व मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबरला सुरू ठेवणे अनिवार्य असेल.

या ॲपमुळे एखादे केंद्र त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर वेळेत पोहचले नसेल किंवा काही अनुचित प्रकार अथवा घटना घडत असेल तर ते या ॲपच्या माध्यमातून त्वरित कळणार असून प्रशासनाला उपाययोजना करणे सोपे होणार आहे. चक्रीका ॲपमुळे कर्मचाऱ्यांचे लोकेशन निवडणूक आयोगाला शेअर होत असते. सदर चक्रीका ॲपमुळे कर्मचाऱ्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रेस केले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना दिलेल्या आयडी व मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करुन ॲप घ्यावे लागणार आहे.

चक्रीका ॲप…..

चक्रीका ॲप हे मतदानाच्या तीन दिवस अगोदर म्हणजे १८, १९ व प्रत्यक्ष मतदानादिवशी २० तारखेला तसेच मतदानानंतर दोन दिवस दि. २१ व २२ रोजी सुरू ठेवण्यात येणार असून हे ॲप दर वीस सेकंदांनी संपूर्ण माहिती इलेक्शन कमिशन ला पाठवत असते. सर्व माहिती तालुका, जिल्हा, मुंबई व दिल्ली येथील इलेक्शन कमिशनच्या कार्यालयांना काही सेकंदात कळते.