ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; सातारा जिल्ह्यात ‘या’ मार्गावर ‘चक्काजाम’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कोल्हापुरात ऐन सणासुदीच्या काळात ऊस आंदोलनाचा भडका उडाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात देखील या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातारा-कोरेगाव रस्त्यावर ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले.

दिवाळीच्या काळातसुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वेगवेगळ्या कारखान्यासमोर आपल्या ऊस दर मागणीची आंदोलन करण्यात आलं होतं. अनेक कारखान्यांची वाहन ऊस तोडी स्वाभिमानी कडून रोखण्यात आल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाने सुद्धा कारखानदार आणि संघटना यांच्यामध्ये बैठक लावून समेट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यामध्येही काही मार्ग निघाला नाही. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे.

कराड तालुक्यात ‘या’ ठिकाणी आंदोलन

दरम्यान, कराड तालुक्यातील पाचवड फाटा आणि उंब्रज-चाफळ रोडवर स्वाभिमानी व बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत ऊस आंदोलनाचा तोडगा निघत नाही तोपर्यंत वाहतूक सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष देवानंद पाटील, कराड तालुकाध्यक्ष बापुसाहेब साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, तालुका अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, दादासाहेब यादव, प्रमोद जगदाळे, सतीश यादव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्ष गणेश शेवाळे यांच्यसह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, उपस्थित होते.

नेमकी काय आहे मागणी?

मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.