पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार; मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होत असल्या कारणाने अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयुसीसी) सदस्यांनी तसेच नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी मध्य रेल्वे विभागास दिले होते. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. आजपासून दि.१३ ऑगस्टपर्यंत सातारा-सांगली-कोल्हापूर विशेष रेल्वे गाडी दररोज धावणार आहे.

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी नुकतेच विशेष पूररेल्वेबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुरानी दुबे यांना याबाबत निवेदन दिले होते. तिवारी यांनी सांगली, कराड, भिलवडी, ताकारी, किर्लोस्करवाडी, सातारा याठिकाणी मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा नद्या ओसंडून वाहत आहेत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फूट तर मिरजेत ५० फूट आहे. सातारा, कराडपासून ५० कि. मी. अंतरावर असलेल्या कोयना धरणातून आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टदरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बेळगाव-मिरज विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाबळेश्वर आणि पाचगणी येथे गेलेले कर्नाटकातील पर्यटक मिरज जंक्शनपर्यंत १८० कि. मी. अंतरावर जाऊन ही विशेष गाडी पकडू शकत नाहीत. त्यासाठी सातारा ते बेळगावी थेट गाडी हवी. प्रत्येक वेळी सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, भिलवडीच्या लोकांनी मिरजेत येऊनच कर्नाटक जाणारी रेल्वे पकडावी, असा आग्रह मध्य रेल्वे करते. त्यामुळे खूप गैरसोय होत आहे. बसेस पुरामुळे धावत नसल्याने आणि लोक अडकून पडल्यामुळे बेळगावी-मिरज पूर विशेष गाडी सातारा स्थानकापर्यंत वाढवावी. बेळगावी-सातारा विशेष रेल्वे चालवून मध्य रेल्वेने लोकांना मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्याची रेल्वे प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे.

सातारा-कोल्हापूर विशेष पूर रेल्वेस मंजुरी : गोपाल तिवारी

बेळगावी-मिरज पूर विशेष गाडी सातारा स्थानकापर्यंत वाढवावी. नैसर्गिक आपत्तीच्या या काळात दक्षिण पश्चिम रेल्वे लोकांना मदत करत आहे. बेळगावी-सातारा विशेष रेल्वे चालवून मध्य रेल्वेने लोकांना मदत करावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानुसार आजपासून मध्य रेल्वेकडून आमच्या मागणीची दखल घेत सातारा-कोल्हापूर विशेष पूर रेल्वेस मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.

अशी धावणार कोल्हापूर-सातारा गाडी (क्र. ०१४११)

कोल्हापूर सकाळी ८:४०, वळीवडे, ८:४८, रुकडी ८:५५, हातकणंगले ९:०५, जयसिंगपूर ९:२०, मिरज सकाळी ९:४५, विश्रामबाग ९:५३, सांगली १०, नांद्रे १०:१५, भिलवडी १०:२५, किर्लोस्करवाडी १०:४०, ताकारी १०:५०, भवानीनगर १०:५५, शेणोली ११:०५, कराड ११:२५, शिरवडे ११:३५, मसूर ११:५०, तारगाव दुपारी १२, रहीमतपूर, १२:१०, कोरेगाव १२:२५, सातारा १:३५

अशी धावणार सातारा-कोल्हापूर गाडी (क्र. ०१४१२)

चा, सातारा दुपारी २:२०, कोरेगाव २:३३, रहीमतपूर २:४३, तारगाव २:५३, मसूर ३:०५, शिरवडे ३:१५, कराड ३:२५, शेणोली ३:३८, भवानीनगर ३:४५, ताकारी ३:५०, किर्लोस्करवाडी ४, भिलवडी ४:१५, नांद्रे ४:२३, सांगली ४:३८, विश्रामबाग ४:४३, मिरज सायं. ५:२०, जयसिंगपूर ५:३५, हातकणंगले ५:५०, रुकडी ६, वळिवडे ६:०६, पंच कोल्हापूर सायंकाळी ६:३५