केंद्र शासनाकडून पशुगणनेस ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आलीय मुदतवाढ

0
144
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील गावागोवी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणनेची मोहिम युध्दपातळीवर राबवली जात आहे. पशुगणना मोहिमेस केंद्र शासनाने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 994 गावातील पशुगणना पुर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यात पशुगणनेचे 50 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येत असते. यावर्षी 25 नोव्हेंबरपासून सातारा जिल्ह्यात पशुगणनेस सुरूवात झाली आहे. राज्य शासनाने दि. 28 फेब्रुवारीपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पशुसंवर्धन विभागासमोर ठेवले होते. मात्र, जिल्ह्यातील खंडाळा, जावली, महाबळेश्वर, वाई, पाटण, कराड व सातारा तालुक्यातील काही गावे दुर्गम व डोंगरी भागात आहेत. त्यामुळे गणनेसाठी गेलेल्या प्रगणकांना नेटवर्कच्या अडचणी येत होत्या.

पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौंटुबिक उपक्रम, बिगर कौंटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या 16 प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागासाठी 216 प्रगणक व 46 पर्यवेक्षकांमार्फत ही गणना करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात 1 हजार 984 गावे आहेत. त्यापैकी 994 गावात पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे. पशुगणनेचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने 31 मार्चपर्यंत पशुगणनेसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गावातील पशुगणना पूर्ण होण्यास मदत होणार आहे.