सातारा प्रतिनिधी । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केल्या. देशात एकूण 7 टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघासाठी (Satara Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यात निवडणूक पार पडणार असून दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे तर दि. 4 जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
आज केंद्रीय निवडणुक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या वतीने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असून त्याबाबतचा निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील साताऱ्यासह रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सांगली, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
अशा प्रकारे पार पडणार निवडणूक प्रक्रिया
दि. 7 मे रोजी होणाऱ्या साताऱ्यासह सहा लोकसभा संघाच्या निवडणुकीसाठी दि. 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहे. तर दि. 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जावर छाननी केली जाणार आहे. दि. 22 एप्रिल रोजीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली असून दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. आणि दि. 4 जून रोजी प्रत्येक्ष निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.