सातारा प्रतिनिधी | ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी नावाने ओळख होती. मात्र, आता दोन्ही पदे रद्द करुन यापुढे केवळ ग्रामपंचायत अधिकारी या पदनामाने नवी ओळख या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामसेवक संघटनेनेनेही याचा फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
ग्रामपंचायतीला शासकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकच होती. मात्र, लहान ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक तर मोठी ग्रामपंचायत संभाळणाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी असे पदनाम असायचे. परंतु दोन्ही पदे एकच असल्याने तसेच वेतन व भत्तेही सारखेच असल्याने ही पदे संभ्रम निर्माण करणारी आहेत. त्यामुळे एकाच नावाने ही ओळख कायम करावी व ग्रामसेवक संवर्गाची वेतन त्रुटी दूर होण्यासाठी राज्य ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही दोन्ही पदे रद्द करून आता ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम कायम करण्यात आले आहे. यामुळे ग्रामसेवक संवर्गाची वेतन त्रुटी दूर झाली आहे.
शासनाच्या या निर्णयाचा ग्रामसेवक संघटनेने सातारा जिल्हा परिषदेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत चव्हाण, सरचिटणीस संदीप सावंत, उपाध्यक्ष विजयराव निंबाळकर, रमेश साळुंखे, गोविंद माने, अशोक मिंड, शरद गायकवाड, मोहन कोळी, मधुकर पाटील संजय यादव, हिम्मत गायकवाड, राहुल कदम, संजय पालवे, विजय भिलारे, अजित जाधव, प्रवीण जाधव, बागल, वायदंडे, जयश्री नलावडे, आदी उपस्थित होते.