साताऱ्याच्या ऐतिहासिक महादरे तलावावर राहणार CCTV चा वाॅच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराच्या पश्‍चिम भागातील ऐतिहासिक महादरे तलावाला आता संरक्षण मिळणार आहे. तसेच येथील पाणीसाठ्यावर देखील लक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेच्या वतीने या ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यातील या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि देखभाल दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयाबाबतनागरिकांमधून समाधान व्यक्‍त केले जात आहेत.

सातारा शहराच्या पश्‍चिम भागामध्ये ऐतिहासिक असा महादरे तलाव आहे. हा तलाव पश्‍चिम भागातील नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा स्त्रोत म्हणून ओळखला जातो. या तलावाला ऐतिहासिक महत्त्व असून या तलावाची पाणी साठवण क्षमताही चांगली आहे. हा दगडी तलाव पाणी अत्यंत स्वच्छ ठेवण्यात सक्षम आहे. या तलावालगतच हत्ती तलाव असून तेथे साठलेले पाणी शुद्ध होऊन महादरे तलावात येत असल्याने ते चवीलाही चांगले आहे. मोरे कॉलनीसह लगतच्या कॉलन्यांसाठी या तलावाचे पाणी वर्षभर पुरते.

मात्र, यंदाच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये अज्ञाताने व्हॉल्व फिरवल्याने येथील सर्व पाणी वाहून हत्ती तलावामध्ये गेले होते. त्यामुळे महादरे तलावामध्ये केवळ पाच फूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता. परिणामी ऐन उन्हाळ्यात येथील पश्‍चिम भागाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. शहरात गेल्या दीड महिन्यांत झालेल्या पावसामुळे हत्ती तलाव आणि महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

त्यामुळे मार्च महिन्यातील पाणी गळतीचे निमित्त पुन्हा उद्‌भवू नये म्हणून सातारा पालिकेने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तलावाच्या परिसरात तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत तसेच महादरे तलावाच्या देखभाल- दुरुस्तीसाठी दोन कर्मचारी तैनात राहणार आहेत. माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी दोन वर्षांपूर्वी या तळ्याचा गाळ काढून स्वच्छता केली होती. त्यामुळे तलावाचा पाणीसाठा 55 लाख लिटरने वाढला होता. या तलावाची देखभाल दुरुस्ती व्हावी याकरिता लेवे यांनी हा प्रस्ताव दिला होता. सातारा पालिकेने या महाद्वारे तलावाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी उचलल्याने नागरिक समाधान व्यक्‍त करत आहेत.