सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर येथील कोळी आळी मधील दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी रायटी जनरेटरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. या घटनेमुळे मोठा स्फोट होऊन दुर्घटना घडली. या अपघातामध्ये दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ बसलेली ८ छोटी मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर सातारा व पुणे येथील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वरातील दुर्गा उत्सव समिती कोळी आळी येथे दुर्गा देवीची मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीमध्ये लहान मुले सुद्धा सहभागी झाली होती. वाजत – गाजत देवीची मिरवणूक सुरू असताना अचानक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की ट्रॅक्टरच्या आजूबाजूला असलेली लहान मुले व मुली यात भाजून गंभीर जखमी झाली. कोणाचे तोंड तर कोणाची पाठ भाजली गेली.
तसेच या दुर्घटनेत मुलांच्या अंगावरील सर्व कपडे जळाले. सर्व जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी सातारा येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर गंभीर असणाऱ्या तीन मुलांना पुण्याला हलवण्यात आले. दरम्यान, घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेचा सीसीसीटीव्ही फुटेज समोर आले असून स्फोट त्यामध्ये घटना घडल्यानंतर एकच धावपळ उडाल्याची दिसून येत आहे. जनरेटरच्या पाईपला गळती लागल्यामुळे जनरेटरने पेट घेतला आणि हा स्फोट झाल्यामुळे लहान मुले देखील भाजली गेली आहेत.