कराड प्रतिनिधी | ग्रामीण भागात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेत आरोग्य विभागाने कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याव्दारे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात माफक दरात हृदरुग्णांवर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात येणार होती. मात्र, कॅथलॅब कराडला मंजुर होऊन सुरु होण्याअगोदरच ती साताऱ्याच्या जिल्हा शल्य चिकीत्सालयात हलवण्यात आली आहे.
कराडला मंजुरी असताना देखील कॅथलॅब सातारला हलवण्यात आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे कॅथलॅब हलवण्याबाबतचा शासन आदेश देखील नुकताच जारी करण्यात आला आहे.
राज्य शासनाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या सोयीसाठी जेथे वैद्यकिय महाविद्यालये नाहीत अशा १९ ठिकाणी कॅथलॅब उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २३१ कोटी एवढी रक्कम देखील मंजुर करण्यात आली. मंजुरी देण्यात आलेल्या १९ ठिकानामध्ये कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा देखील समावेश करण्यात आला होता.
नेमका शासन आदेश काय?
मंजुर झालेल्या कॅथलॅबमधील उपजिल्हा रुग्णालय येथील कॅथलॅब जिल्हा रुग्णालय, सातारा येथे जागा उपलब्धतेच्या अधिन राहुन स्थलांतरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे शासनाच्या आदेशात म्हंटले आहे.
परिसरातील रुग्णांना दिले जातात उपचार
कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कराडसह सातारा, खटाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, पाटण तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना येथे चांगली आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न रुग्णालयातमार्फत केला जातो. त्यामुळे दररोज शेकडो रुग्ण येथे उपचारासाठी येतात.
रुग्णांना ‘या’ सेवेपासून वंचितच रहावे लागणार…
कराड येथे कॅथलॅब सुरु झाली असती तर उच्च रक्तदाब, मधुमेह व ह्दयाच्यासंदर्भात आरोग्य सेवा सहा तालुक्यातील रुग्णांना मिळाली असती. मात्र, ही कॅथलॅब साताऱ्याला हलवण्यात येणार असल्याने या सहा तालुक्यातील रुग्णांना त्या सेवेपासुन वंचीतच राहावे लागणार आहे.