सातारा प्रतिनिधी | अवैध दारू वाहतूकप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील सातारा निरीक्षकांच्या भरारी पथकाने सातार्यातील राधिका रोडवर येथील दोघांवर तर वाई-महाबळेश्वर निरीक्षकांनी मेढा येथे कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून सुमारे 2 लाख 61 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके सक्रिय झाली आहेत. जिल्ह्यात आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (मुंबई), विभागीय आयुक्त विजय चिंचाळकर (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा तसेच मेढा येथे अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करण्यात आली.
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा भरारी पथकाने सातार्यातील राधिका रोडवर दारूची अवैध वाहतूक पकडली. त्यामध्ये शशिकांत साह व संदेश शेलार (दोघेही रा. म्हसवे, ता. सातारा) यांना अटक करण्या आली. त्यांच्याकडून 9 हजार 135 रूपये किंमतीचे दारूचे 3 बॉक्स जप्त करण्यात आले. वाहनासह 1 लाख 79 हजार 135 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सातारा निरीक्षक माधव चव्हाण तपास करत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाई-महाबळेश्वर कार्यालयाने मेढा (ता. जावली) येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी विजय शामराव धनवडे याला अटक केली. त्याच्याकडून वाहनासह 82 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास वाई-महाबळेश्वरचे निरीक्षक आर. एन. कोळी करत आहेत.