कराड प्रतिनिधी । राज्यात मराठीत बोला, मराठीत लिहा, मराठीत वाचा, असा अध्यादेश राज्य सरकारकडून नुकताच राज्यात जारी करण्यात आला आहे. या अध्यादेशामुळे भाषिक आत्मविश्वास वाढायला मदत होणार आहे. मात्र, काही ठिकाणी मराठी माणसांना हिंदी तर हिंदी माणसांना मराठी बोलता येत नसल्याने वादावादीचे प्रकार घडत आहे. अशात मराठी बोलता येत नसल्याच्या कारणावरून चौघांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापकासह बेटर आणि आचाऱ्याला लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना कराड तालुक्यात घडली आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथील हॉटेल राजस्थानी येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबत हॉटेल व्यवस्थापक प्रल्हाद गोबरलाल परमार (मूळ रा. कानेलाव, पो. कुर्णा, ता.जि. पार्ली, राजस्थान) यांनी तळबीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश कृष्णात निकम, प्रज्वल तुकाराम निकम, दीपक दत्तात्रय लोकरे, गौरव मधुकर रावते (सर्वजण रा. इंदोली, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत असलेले हॉटेल राजस्थानी हे बिरू लुबाराम चौहान यांनी चालविण्यास घेतले आहे. त्याठिकाणी प्रल्हाद परमार हे व्यवस्थापक म्हणून प्रल्हाद बुधाराम कुमार हे वेटर म्हणून तर सुरेश गोबरलाल परमार हे आचारी म्हणून काम पाहतात. दोन दिवसांपूर्वी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करीत असताना चार युवक दुचाकीवरून त्याठिकाणी आले.
त्यांनी जेवण आहे का?, अशी विचारणा केली. त्यावेळी व्यवस्थापक प्रल्हाद परमार यांनी मला मराठी समजत नाही हिंदीमध्ये बोला, असे सांगितले. त्यावेळी एका युवकाने तू मराठीत बोल नाहीतर तुला सोडणार नाही, असे म्हणून वादावादी घातली. त्यानंतर चौघांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापक प्रल्हाद परमार यांना तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणत लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यामध्ये प्रल्हाद परमार हे गंभीर जखमी झाले. सुरेश परमार आणि प्रल्हाद कुमार हे भांडण सोडवण्यासाठी त्याठिकाणी आले असता संबंधित युवकांनी त्यांनाही लोखंडी पाइप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.