सातारा प्रतिनिधी | सातारा शहरानजीक महामार्गावर चक्क वाहने रोखून नवीन घेतलेल्या कारचे फोटो, व्हिडीओ बनवण्यात आले. ड्रोनने शूटिंग करत त्याची रिल्स इन्स्टाग्रामवर टाकणे पाच जणांना चांगलेच भोवले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे. दरम्यान, पोलिसांनी ड्रोन जप्त केला आहे.
ओम प्रवीण जाधव (वय 21, रा. तारळे, ता. पाटण, सध्या रा. जुना आरटीओ चौक, सातारा),
कुशल सुभाष कदम (वय 20, रा. जरंडेश्वर नाका, सातारा), सोहम महेश शिंदे (वय 20, रा. शिंगणापूर ता. माण), निखील दामोदर महांगडे (वय 27, रा. परखंदी ता. वाई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील ओम जाधव याची कार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहराला लागूून महामार्ग जात आहे. दि. 10 जुलै रोजी बॉम्बे रेस्टारंट येथील उड्डाण पुलावर जाणारी वाहने काही टोळकी अडवत होती. यामुळे क्षणात वाहतूक संथ झाली व चालकांमध्ये काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले. वाहन चालकांनी पाहिले असता नव्या कारचे काही युवक ड्रोनच्या माध्यमातून शुटींग करत होते. महामार्ग अडवून सुमारे अर्धा तास नव्या कारचे शुटींग झाल्यानंतर टोळके तेथून गेले.
महामार्गावर बनवलेल्या या व्हिडीओचे एडिटींग करुन तो व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल झाला. सातार्यात महामार्ग अडवून रिल्स बनवली गेली असल्याची पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सातारा शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक (डीबी) व महामार्ग पोलिस यांनी संबंधित रिल्स बनवणार्यांचा शोध घेतला असता त्यामध्ये पाचजण सापडले.
पोलिसांनी वाहन चालक व ड्रोन वापरणार्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी संबंधित कृत्य केल्याची कबुली दिली. यामध्ये आणखी ज्यांचा सहभाग असेल त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. पोनि राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, सपोनि अभिजीत यादव, फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, सुहास पवार, रमेश शिखरे, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.