सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात अनेक गुन्ह्याच्या घटना घडत असतात. त्या गुन्ह्यातील आरोपीना पोलिसांकडून शिक्षा देखील केली जाते. अशीच एक विचित्र घटना साताऱ्यात घडली असून चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली. राजू उत्तम निकम (वय ५०, रा. माहुली, ता. खानापूर, सांगली), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. राजू निकम यांचा मुलगा शुभम निकम हा सध्या जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला भेटण्यासाठी आलेल्या वडिलांच्या कपड्यांच्या पॅन्टच्या खिशाची कारागृहातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यावर हे सिमकार्ड सापडले.
त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. हवालदार महेंद्र पाटोळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांच्या मते, मुलासोबत संपर्क साधण्याच्या उद्देशाने वडिलांनी हे सिमकार्ड दिले असण्याची शक्यता आहे. मात्र, कारागृहात जॅमर असताना मोबाइल कसा सुरू राहिला, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.