उदयनराजेंसह 50 जणांवर गुन्हा दाखल; दमदाटी, मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी फिर्याद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते पार पडणारे भूमिपूजन उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावलं. स्वतः उदयनराजे यांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी असलेला कंटेनरहि कार्यकर्त्यांकडून पलटी करण्यात आला. अखेर या सर्व राड्यानंतर उदयनराजे यांच्यासहित ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलम 141,143,149,506,427 या कलमांतर्गत गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी 35 ओळखीचे आणि पंधरा अनोळखी व्यक्तींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता उदयनराजे भोसले नेमकं काय उत्तर देणार हे आता पाहावं लागेल.

नेमकं काय आहे प्रकरण –

खिंडवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होता. त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. परंतु त्यापूर्वीच उदयनराजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सदर ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम उधळुन लावला. भूमिपूजन ठिकाणी असलेले काही साहित्य फेकून दिले, येव्हडच नव्हे तर ऑफिसच्या कामकाजासाठी उभारण्यात आलेला कंटेनरही उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी पलटी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले, परंतु ही जागा माझ्या मालकिची आहे. माझ्या जागेत शेड असल्याने ते माझेच आहे, मी ते तोडलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असा सवाल उदयनराजे यांनी पोलिसाना केला. या घडामोडींनंतर पोलिसांच्या सुरक्षेत शिवेंद्रराजे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.