वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या सर्कल अन् तलाठ्याच्या अंगावर जेसीबी घालून खुनाचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नढवळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत येरळवाडी धरण क्षेत्रातून बेकायदा वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निमसोडच्या मंडलाधिकाऱ्यासह तलाठ्याला मारहाण करून जेसीबी अंगावर घालत खुनी हल्ला केल्याप्रकरणी वडूजच्या सात वाळूमाफियांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

निमसोड विभागाचे मंडलाधिकारी शंकर चाटे (सध्या रा. वडूज, मूळ रा. खापरतोंड, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेश नारायण गोडसे, हेमंत उर्फ (सोन्या कच्ची) राजेंद्र गोडसे, जेसीबी चालक, ट्रॅक्टर चालक व इतर तीन अनोळखी (सर्व रा. वडूज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील हेमंत गोडसे याला अटक करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी, येरळवाडी धरणाच्या नढवळ हद्दीत दि. 30 मार्च रोजी पहाटे महेश गोडसे हा त्याच्या हस्तकांमार्फत जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूचे बेकायदेशीर उत्खनन करून वाहतूक करत होता. तसेच अन्य संशयितही वाळू उपसा करत होते. त्यावेळी मंडलाधिकारी चाटे व तलाठी साळुंखे तेथे गेले असता हेमंत व अन्य अनोळखी इसमांनी हाताने व दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी चाटे यांना मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने जेसीबी अंगावर घातला. तेव्हा तलाठी साळुंखे यांनी चाटे यांना बाजूला ओढले. त्यानंतर चाटे हे जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना वाळू माफियांनी चाटे यांच्या दिशेने पुन्हा दगडफेक केली. यात साळुंखे व चाटे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सर्व संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

घटनास्थळी खटावच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. वडूजचे उपनिरीक्षक प्रमोद वाघ हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या कामात मग्न असल्याचे पाहून खटाव-माणमधील वाळू माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.