सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयात पर्यटन स्थळावर घडत असलेल्या अपघाताच्या घटना विचारात घेता खबरदारी म्हणून पर्यटनाला बंदी असतानाही ठोसेघर, ता. सातारा येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
अभिजित मानसिंग देशमुख (वय ३०, रा. सातारा), रोहन जालिंदर पवार (रा. विकासनगर, सातारा), विकास राजेंद्र येवले (वय २२, रा. संगम माऊली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतीवृष्टीमुळे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे. असे असतानाही काळी पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जात आहेत. वरील संशयितही ठोसेघर धबधबा या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. पोलिसांना बोरणे घाटात हे तरुण येताना आढळून आले. सहायक पोलिस फौजदार धनाजी वायदंडे यांनी त्यांच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला.