कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीच्या ऑनलाइन प्रक्रियेत नमुना आठ या अर्जाद्वारे स्थलांतर दाखवून वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावाने तब्बल ४६२ ऑनलाइन अर्ज दाखल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ऑनलाइन प्रणाली वापरकर्ता ‘सतीश सर’ नामक व्यक्तीवर शासनाच्यावतीने निवडणूक शाखेच्या वतीने शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत निरंतर प्रक्रियेमध्ये ५ ते १३ सप्टेंबर या कालावधीत सतीश सर या ऑनलाइन प्रणाली वापरकर्त्याने एकाच नावाने हजारमाची (ता. कराड) येथील व्यक्तीच्या २० देयकांत खाडाखोड करून, स्थलांतरितांसाठी नमुना नंबर आठचे ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केले. निवडणूक आयोगाने ३० ऑगस्ट रोजी एक जुलै या अर्हता दिनांकावर आधारित जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.
या प्रसिद्धीनंतर निरंतर मतदार नोंदणीअंतर्गत नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी व स्थलांतरित अर्ज दाखल करण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या पोर्टल आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, या सुविधेचा गैरवापर करीत नमुना आठ अर्जाद्वारे सतीश सर नामक व्यक्तीने स्थलांतर दाखवून पोर्टलमध्ये ४६२ अर्ज दाखल केले. अर्जासोबत रहिवासा बाबत पुरावा म्हणून मारुती महादेव सूर्यवंशी (रा. हजारमाची) यांचे वीज देयक व त्यावरील ग्राहक क्रमांक चार अंकामध्ये व्हाइटनरच्या साह्याने खाडाखोड केली. पुराव्याची कागदपत्रे सदराखाली खाडाखोड केलेले वीज देयक ऑनलाइन अपलोड केले. निवडणूक शाखेने कागदपत्रांची पडताळणी केली असता, ही बाब निदर्शनास आल्याने लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम ३१ या कायद्यातील तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी सतीश सर नामक व्यक्तीवर निवडणूक शाखेने कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.