सातारा प्रतिनिधी | हुबळी येथील जमीन खरेदीसाठी नेण्यात येणारी २ कोटी ९५ लाखांची रोकड चालकासह चार जणांनी लिंब फाटा परिसरातून लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बन्सीलाल बागाराम परमार (रा. मालाड वेस्ट, मुंबई) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देखील दिली. त्यांच्या तक्रारीनुसार चौघांवर विश्वासघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बन्सीलाल परमार (वय ४१) हे मूळचे राजस्थान येथील असून, त्यांचा मालाड वेस्ट परिसरात सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. याचबरोबर ते जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसायही करतात. परमार यांनी हुबळी येथे दहा लाख रुपये दराने ३० गुंठे जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार त्यासाठीच्या रकमेची जुळवणी त्यांनी केली होती. ता. १२ रोजी ते चालक भगवतसिंग, मांगीलाल (पूर्ण नाव पत्ता नाही), अल्ताफ ऊर्फ बाबूलाल युसूफ खान, गोविंद हिरागर (पत्ता नाही) यांच्यासमवेत चारचाकीतून हुबळीकडे निघाले होते.
यावेळी त्यांच्याकडे २ कोटी ९५ लाखांची रोकड होती. आनेवाडी टोलनाका येथे रात्री ते आले असतानाच मालाड वेस्ट येथील घरातून परमार यांना फोन आला. फोन करणाऱ्याने पत्नीची तब्येत बिघडल्याचे सांगितले. यानुसार परमार यांनी लिंबफाटा येथे गाडी थांबवत चालक भगवतसिंग व इतरांना मी येथूनच माघारी जातो, तुम्ही रोकड घेऊन हुबळी येथील ऑफिसला जा, असे सांगितले. यानंतर परमार है खासगी गाडीने पुन्हा त्याठिकाणाहून मालाड वेस्ट येथे परतले. रोकड घेऊन जाणारी चारचाकी नंतर तळबीड व इतर टोलनाके ओलांडून गेल्याचे, तसेच त्याचा टोल कपात झाल्याचे मेसेज परमार यांच्या मोबाईलवर येत होते.
पत्नीस रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी भगवतसिंग याच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तो बंद होता. वारंवार फोन करूनही तो बंद येत असल्याने, तसेच रोकड घेऊन ते हुबळी येथील ऑफिसवर पोचले नसल्याचे त्यांना समजले. शोध घेऊनही न त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी याची तक्रार शुक्रवारी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार भगवतसिंग, मांगीलाल, अल्ताफ खान, गोविंद हिरागर यांच्यावर विश्वासघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास पोलिस निरीक्षक तांबे करीत आहेत.