सातारा प्रतिनिधी । अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करून पैसे लुटल्याच्या घटना सातारा जिल्ह्यात सध्या घडत आहेत. अशा प्रकारच्या घटनांना अनेकजण बळी देखील पडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील एका व्यवसायिकाच्या बाबतीत घडली असून या प्रकरणी साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असून तुम्हाला केंद्र शासनाचे मोठे कंत्राट मिळवून देतो,” असे सांगत सताऱ्यातील काश्मिरा पवार हिने एका व्यावसायिकाची तब्बल ५० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात काश्मिरासह पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काश्मीरा संदीप पवार (वय २९, रा. कोयना सोसायटी, सदर बाजार, सातारा) व गणेश गायकवाड (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संबंधित दोघा जणांवर भादवि ४१९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील सारंग सोसायटी, गवळीवाडा, सहकारनगर येथे राहणाऱ्या व्यावसायिक गोरख जगन्नाथ मरळ यांची डिसेंबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधी पुण्यामधील विधान भवन या ठिकाणी संबंधित आरोपींनी भेट घेतली. यावेळी काश्मिरा हिने आपण पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत वेळोवेळी विधान भवन तसेच तिच्या घरी, चांदणी चौकातील टोनी का ढाबा या हॉटेलवर बोलावून घेतले.
त्यांना शासकीय कंत्राट मिळवून देतो असे सांगण्यात आले. परंतु कश्मीर पवार हिने मरळ यांना कोणतेही कॉन्ट्रॅक्ट न देता त्यांची फसवणूक केली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर गोरख मरळ यांनी सातारा पोलिसांकडे धाव घेतली. तसेच पुणे येथे देखील तक्रार दाखल केली. यानंतर पुणे पोलिसांनी काश्मीरा पवार आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.