परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; सातारच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ऑनलाईन मार्केटिंग तसेच फाॅरेक्स ट्रेडींगच्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखविण्याचे प्रकार सद्या वाढले आहे. सुरुवातीला पैसे गुंतवण्यास सांगून नंतर फसवणूक केली जात आहे. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. पैसे गुंतवण्यास सांगत २० जणांची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी साताऱ्यातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये हनुमंत तुकाराम मोरे (रा. गांधीनगर, सातारा), नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते (रा. कोळकी, सातारा), अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण (रा. मुनानगर, सातारा), शशिकला मारूती वादगावे, सुरेश गोरख कुंभार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित आरोपींनी पुण्यात २० जनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर अपहार, तसे महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण काायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिगंबर पोपट गायकवाड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गायकवाड यांना परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष आरोपींनी दाखविले होते. आरोपींनी एका वित्तीय संस्थेचे संचालक असल्याची बतावणी केली होती. गायकवाड यांनी आरोपींकडे २२ लाख ५० हजार रुपये दिले. सुरुवातीला आरोपींनी त्यांना परतावा दिला. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.