सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर जोशीविहिर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय ४५, रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धीरज पाटील (वय ३८, रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारतच्या सातारा कार्यालयात वितरण विभागात कार्यरत होते.
मंदार कोल्हटकर व धीरज पाटील हे आपल्या दुचाकीवरुन रस्त्याच्या डावीकडून साताऱ्याच्या दिशेने येत होते. त्याचवेळी पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या विजय शहा (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांच्या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की दोघेही उडून दूर फेकले गेले.
जोशी विहीर येथे कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दोघे जागीच ठार* pic.twitter.com/zSZoQHidnc
— santosh gurav (@santosh29590931) April 19, 2024
सीसीटीव्हीत अपघाताची घटना कैद
महामार्गाच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून क्वीड कार ही महामार्गावरील मधली लेन सोडून डाव्या लेनमध्ये घुसल्याने हा अपघात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरुनच क्वीड कार चालक अनियंत्रित असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात तरुण भारत परिवारातील सदस्य, पत्रकार तसेच साताऱ्याच्या नाट्याक्षेत्रातील अनेक कलाकारांनी गर्दी केली होती.
मंदारचे नाट्य क्षेत्रात योगदान
साताऱ्याच्या नाट्य क्षेत्रात मंदार कोल्हटकर यांचे योगदान होते. त्याने काही चित्रपट, मालिका, नाटके तसेच जाहिरातींसाठी अभिनय केला होता. मंदार कोल्हटकर यांच्या पश्चात आई वैजयंती, पत्नी मयुरा, दोन मुले मितेश आणि मिहीर, असा परिवार आहे. धीरज पाटील यांच्या पश्चात वडील बाळासो, आई उषाताई, असा परिवार आहे. मंदार कोल्हटकर यांचा पार्थिवावर शुक्रवारी संगममाहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, तर धीरज पाटील यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम ढवळी या ठिकाणी होणार आहे.
उदयनराजे यांच्याकडून सांत्वन
या दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे तरुण भारत परिवार, साताऱ्यातील नाट्यकर्मी व वृत्तपत्र कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री जिल्हा रुग्णालयात येऊन दोन्ही परिवारांची भेट घेऊन शोकभावना व्यक्त करून सांत्वन केले.