सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी गत महिन्याच्या सुरुवातीला ‘वंचित’ ने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर काल पुन्हा आणखी १६ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. कराड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत ‘वंचित’चे जिल्ह्यात तीन उमेदवार जाहीर झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठीही तयारी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. शनिवारी ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील १६ मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे.
संजय गाडे यांना कराड दक्षिण मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे. याठिकाणी काॅंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण हे रिंगणात उतरणार आहेत. तर भाजपकडून अतुल भोसले मैदानात असतील. कोरेगाव मतदारसंघातही ‘वंचित’ने चंद्रकांत कांबळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या ९ आॅक्टोबरच्या दुसऱ्या यादीत माण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली. इम्तियाज नदाफ यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यातच ‘वंचित’ जिल्ह्यातील सर्वच आठ मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची नावेही लवकरच जाहीर होतील, असेही ‘वंचित’कडून स्पष्ट करण्यात आलेले आहे