वाईकरांचा लाडका आमदार; कार्यकर्त्यांच्या प्रेमाने असा ‘मकरंद’ बहरला!

0
1

सातारा प्रतिनिधी । कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मकरंद पाटील (Makrand Patil) यांचे पहिल्यांदाच आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्यात दाखल होताच मंत्री मकरंद आबांचं कार्यकर्त्यांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या मकरंद आबांची चक्क घोड्यावरून आणि बैलगाडीतून मिरवणूक काढली. महायुती सरकारमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री झालेल्या पाटलांचा ‘मकरंद’ हे आज कार्यकर्त्यांच्या प्रेमाने बहरलेले पहायला मिळाले.

वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे आज मदत आणि पुर्नवसन मंत्रिपद मिळवल्यानंतर सातारा जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी प्रथम खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे शिंदेवाडीत वाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आले. येथील कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या आबांची चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली. हलगीच्या तालावर जोरदार घोषणाबाजी देत फुलांची जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत मकरंद आबांचं जंगी स्वागत केलं.

त्यानंतर खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे जाऊन मंत्री मकरंद पाटील यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर मंत्री मकरंद आबांची कवठे येथील कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून जंगी मिरवणूकच काढली. याच ठिकाणी त्यांची कार्यकर्त्यांच्या वतीने वही तुला देखील करण्यात आली. सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापासून ते घरापर्यंत मंत्री मकरंद पाटील यांचं कार्यकर्त्यांच्या वतीने ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं.

सातारा जिल्ह्यात वाई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, राष्ट्रवादीचे मदन पिसाळ यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं होते. त्यानंतर आजपर्यंत वाई तालुक्याला मंत्रिपदाची हुलकावणी दिली होती. अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या मकरंद जाधव पाटील यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला. अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवले आहे,आता मकरंद पाटील यांना मंत्रीपद देऊन अजित पवारांनी वाईत डबल धमाका केला आहे.