कराड प्रतिनिधी | सोमवार दि. 17 रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या निमित्ताने गुरूवारी कराडच्या बाजारात बोकड खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. 15 हजार रूपयांपासून 1 लाख रूपये किमतीचे बोकड विक्रीसाठी आले होते. एकाच दिवसांत जवळपास 772 बोकडांचे खरेदी-विक्री व्यवहार झाले असून सुमारे पाच कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.
बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजात कुर्बानी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्यावतीने मोठयाप्रमाणात बोकड खरेदी केली जाते. अनेक मुस्लिम कुटुंबात सहा महिने ते वर्षभर आधिच बोकड खरेदी केले जाते. तसेच त्याचा सांभाळ करूण बकरी ईदच्या दिवशी कुर्बाणी दिली जाते. तर बहुतांष मुस्लिम बांधव बकरी ईदच्या एक दिवस आधी बोकड खरेदी करतात.
सोमवारी बकरी ईद साजरी होणार असल्याने गुरूवारी कराडला जनावरांच्या बाजारात बोकडांचा बाजार भरला होता. या बाजारात सातारा, सांगली, रत्नागीरी, चिपळूण, कोल्हापूर आदी जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने बोकड विक्रीसाठी आले होते. गावठी बोकडांसह बिट्टल, उस्मानाबदी, आफ्रिकन बोर, आदी जातीच्या बोकडांच्या यात समावेश होता. 15 हजार रूपयांपासून 1 लाख रूपये किमतीचे बोकड विक्रीसाठी दाखल झाल्याने मुस्लिम बांधवांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. या बाजारात एकुण 772 बोकडांची खरेदी-विक्री झाली. यातून सुमारे पाच कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.