सातारा प्रतिनिधी | ‘अमर रहे, अमर रहे, सुभेदार संजय पवार अमर रहे,’ अशा घोषणा देत साश्रूनयनांनी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात सुभेदार संजय पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सुभेदार पवार यांना त्यांचे चिरंजीव प्रथमेश व वडील रघुनाथ पवार यांनी भडाग्नी दिला.
फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सुभेदार पवार यांची अंत्ययात्रा माहुलीपर्यंत काढण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. येथील रविवार पेठेतील गीते बिल्डिंगमदील रहिवासी सुभेदार संजय रघुनाथ पवार यांचे आकस्मित निधन झाले. ते 27 वर्षे 5 पॅरा (स्पेशल फोर्स) फोर्समध्ये कार्यरत होते.
यावेळी त्यांची आई इंदूबाई, वडील, पत्नी व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. संजय पवार यांच्या पत्नी सुवर्णा, मुलगा प्रथमेश व मुलगी वैष्णवी यांच्या हातात तिरंगा झेंडा अर्पण करताना पाच पॅरा फोर्सचे सुभेदार शिंदे यांना अश्रू अनावर झाले. माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, राम हादगे, अविनाश बाचल, नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे, एपीआय अविनाश माने तसेच जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने भालचंद्र कुंभार यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी सुवर्णा, तसेच संगीता सुनिल चव्हाण, सुमन जयवंत जाधव या दोन बहिणी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पाच पॅरा फोर्सच्यावतीने नाईक अमोल शेलार, ज्योतीराम झांजुर्णे, सुनील नलगे, चंद्रकांत खेडेकर, मिंच्छद्र शिंदे व चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्यावतीने नायब सुभेदार रघुराज सिंह यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पार्थिवास गार्ड ऑफ ऑनर सातारा पोलीस व जाट रेजिमेंट यांच्यातर्फे हवेत गोळीबार करून सलामी दिली.