सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त पुसेगावात ‘इतके’ दिवस भरणार बैलबाजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त दि. २४ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत बैलबाजाराचे आयोजन केले आहे. जातिवंत खिलार जनावरांसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा बैलबाजार यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रस्टच्यावतीने भरवण्यात येणार आहे. पुसेगावच्या बैलबाजाराला मोठी परंपरा आहे. याठिकाणी येणारे बैल जातिवंत असतात, अशी ख्याती आहे. दरम्यान, हा बैलबाजार बारा दिवस भरवण्यात येणार असल्याने राज्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

त्यामुळे खिलार बैल, पशुधनाच्या खरेदी- विक्रीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या अनेक भागांतून शेतकरी तसेच व्यापारी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. बैलगाडा शर्यतीमुळे खिल्लार बैलांच्या मागणीत वाढ झाली असून त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे पुसेगाव यात्रेतील बैल बाजारात यंदा मोठी आर्थिक उलाढाल होऊन शेतकरी व व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे. यात्रा कालावधीत जवळपास १२ दिवस भरणाऱ्या या बैलबाजारात बैलगाड्या, औतकामाचे साहित्य, बैलांचे कासरे, छकडे तसेच शेती आणि बैलगाडी शर्यत क्षेत्राशी निगडित साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.

दरम्यान, सेवागिरी यात्रेतील बैलबाजाराचा महाराष्ट्राच्या शेती आणि बैलगाडी क्षेत्रासोबतच ग्रामीण अर्थकारणावर देखील परिणाम होत असल्याने या बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बैलबाजारात येणारी जनावरे आणि त्यांच्या मालकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा ट्रस्टमार्फत पुरवल्या जातील. तरी राज्यातील खिलारप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.