सातारा प्रतिनिधी । कराडच्या विमानतळ (Kaard Airport) विस्ताराऐवजी पुसेगाव (Pusegaon) येथे विमानतळ उभारावे या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हा परिषद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, विमानतळ विस्तार विरोधी कृती समितीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, बागायती जमीन वाचलीच पाहिजे, भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था वाचलीच पाहिजे अशा घोषणा देत श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कराड विमानतळाचा स्थगित झालेला मुद्दा गत विधानसभा अधिवेशनात उपस्थितीत करताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बाधित जनतेचा विस्ताराला विरोध नसल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांचा विरोध असल्याचे सांगूनही आ. चव्हाणांनी खोटी माहिती दिली आहे. कराडच्या विमानतळ विस्ताराऐवजी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त न करता नवे मोठे विमानतळ हे पुसेगाव येथील माळरानावर उभारावे, असा पर्याय मांडला आहे. त्याचा गांभीर्याने विचार करावा, यासाठी जिल्हा परिषद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी श्रमूदचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर म्हणाले, 2011 सालापासून अन्यायकारक पद्धतीने कराड विमानतळ विस्ताराचा जो हट्ट सरकारने धरला आहे त्याच्या विरोधात मोर्चा आहे. केंद्राचे 2007 चे पुनर्वसन धोरण आहे त्यानुसार एखाद्या प्रकल्पाचा हेतू साध्य करण्यासाठी कमीत कमी हानिकारक, कमीत कमी जमीन जाणारा किंवा जमीन अजिबात न जाणारा असा प्रस्ताव बाधित लोकांच्यावतीने मांडला जात असेल तर तो प्रस्ताव स्वीकरला पाहिजे. पुसेगाव शेजारी खडकाळ असणारी आणि सातारा जिल्हयाचा विकास करणारी जागा दाखवली आहे. त्याठिकाणी कोणाची पिकाऊ जमीन जात नाही असा परसत्व आम्ही मांडला आहे. दुष्काळी भागात फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रचंड विकास होऊ शकला असता.
कराड विमानतळ विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु आहे त्याठिकाणी बागायती जमीन आहे. ती घालवण्याचा घाट सुरु आहे त्याठिकाणी अतिवृष्टीत पाणी साचते. दोन्ही बाजूस डोंगरांचा धोका आहे. संपादनाची बेकायदेशीररीत्या प्रक्रिया राबवली गेली आहे. विरोध असल्याने तत्कालीन सरकारने पुढे पाऊल टाकले नाही. सरकारने कराड विमानतळ रद्द करून पुसेगाव येथे विमानतळ करावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, चंद्रकांत पाटील, सिद्धेश्वर पाटील, चैतन्य दळवी आदी शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते.