शिरसवडीत बहीण-भाऊ कालव्यात बुडाले; बहिणीसह वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह सापडला

0
1771
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील तळेवस्ती येथील उरमोडी कॅनॉल मध्ये बहीण-भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. यातील ५ वर्षांची बालिकेचा मृतदेह सापडला होता, तर ७ वर्षीय मुलाचा आज बुधवारी सकाळी गोपूज हद्दीतील आरे नावाच्या शिवारा नजिकच्या कॅनॉलमध्ये मृतदेह सापडला.

रिया शिवाजी इंगळे, सत्यम उर्फ गणू शिवाजी इंगळे अशी मृत बालकाची नावे आहेत. या घटनेमुळे शिरसवडी गावावर शोककळा पसरली. याबाबतची अधिक माहिती अशी की, शिरसवडी येथील खोल ओढा शिवारातील शिवाजी नाना इंगळे यांचा मुलगा गणू व मुलगी रिया हे दोघे शाळेतून मंगळवारी दुपारी घरी येत होते. रिया ही गोपूजवाडा येथील अंगणवाडीत, तर बेपत्ता गणू हा शिरसवडी भाग शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास ते दोघे घरी येत असताना येथील तळवस्ती येथे हे बहीण- भाऊ बेपत्ता झाले होते. रिया हिचा मृतदेह शिरसवडी व गोपुज गावच्या शिवेवर असणाऱ्या शेरीवस्ती येथे उरमोडी कालव्याच्या पाण्यामध्ये आढळून आला, तर गणू याचा शोध अद्याप सुरू होता. शिरसवडी ते सिद्धेश्वर कुरोली यादरम्यान कालवा परिसरात गणू याचा मृतदेह आढळून आला.

रियाचा मृतदेह सापडल्यानंतर सत्यमला शोधण्यासाठी ग्रामस्थ, पोलिस व अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु होती. पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता. आज सकाळी सत्यमचा मृतदेह आढळून आला. यावेळी शिरसवडी, गोपूज, गुरसाळे आदी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.