कराड प्रतिनिधी | संतोष गुरव
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज या गावाची नीलम शिंदे ही तरुणी कॅलिफोर्निया येथे गेल्या चार वर्षांपासून शिकत आहे. तिचा 14 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला. तिच्यावर सॅक्रामेंटोच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेली अनेक दिवस अमेरिकेला जाण्यासाठी तिचे वडील तानाजी शिंदे इमर्जन्सी व्हिसासाठी प्रयत्न करीत होते. अखेर नीलमला भेटण्यासाठी तिचे वडील तानाजी शिंदे आणि मामेभाऊ गौरव कदम यांना आपत्कालीन परिस्थितीत अमेरिकेचा व्हिसा अखेर मंजूर झालाय. आज रात्री अमेरिकेसाठी ते रवाना होतील, अशी माहिती अशी अपघातग्रस्त नीलम शिंदे यांचे मामा संजय कदम यांनी नुकतीच ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
गेली १३ दिवसांपासून अमेरिकेला जाण्यासाठी नीलम शिंदे हिचे वडील तानाजी शिंदे व मामा संजय कदम इमर्जन्सी व्हिसासाठी प्रयत्न करीत होते. या काळात त्यांनी अनेकांची भेट घेतली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अतुल भोसले यांनी आपापल्या पातळीवर शिंदे कुटुंबियांना व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न व पाठपुरावा केला. शिवाय माध्यमांशी देखील शिंदे कुटुंबीयांची कैफियत मांडल्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाला दखल घ्यावी लागली.
आज शुक्रवारी दिवसभर नीलम हिचे वडील तानाजी शिंदे आणि गौरव कदम आणि मामा संजय कदम हे तिघे मुंबईत व्हिसा मंजूरीसाठी मुलाखतीसाठी हजर राहिले. अमेरिकन दूतावासाने तानाजी व संजय यांच्याशी संपर्क साधून आज सकाळी मुंबईत व्हिसापूर्वीच्या मुलाखतीसाठी वेळ दिली. सकाळी ही मुलाखत झाल्यानंतर व्हिसा मंजूर झाला.
व्हिसासाठी सर्वांनी प्रयत्न केल्याबद्दल आभारी आहोत : संजय कदम
आज आमचे वाणिज्य दूतावासाशी बोलणे झाले. त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर आमची प्रक्रिया तासाभरात झाली. सुरुवातीला आमची दखलच घेतली जात नव्हती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेऊन मदत केली. त्यांच्या मदतीमुळे प्रक्रिया सोपी झाली. राज्य शासन, केंद्र शासनाचीही भरपूर मदत झाली असल्याची प्रतिक्रिया नीलमचे मामा संजय कदम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.