सातारा प्रतिनिधी । तहसीलदारांच्या शासकीय गाडी क्रमांक (एमएच ११, डीएन ८००४) वरील अंबर दिवा अज्ञात व्यक्तींनी फोडून नुकसान केल्याची घटना खटाव येथे घडली असून या प्रकरणी गाडी चालक सचिन सूर्यकांत नागे यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून वडूज पोलिसांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, ज्यावेळी खटाव येथील तहसीलदारांच्या गाडीचा अंबर दिवा फोडण्याची घटना घडली. ती घटना घडण्यापूर्वी काही तास अगोदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश गाडे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदन दिले होते. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की, सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या खटाव तहसील यांच्या शासकीय वाहनावर कायमस्वरूपी गोल फिरणारा अंबर दिवा लावलेला दिसून येत आहे.
हा अंबर दिवा शासकीय नियमानुसार लावलेला नाही. हा गुन्हा असून, तहसीलदारांवर कायदेशीर कारवाई तत्काळ करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. त्यामुळे नेमका अंबर दिवा कोणी फोडला? याबाबत तालुक्यासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू होत्या.