कराड प्रतिनिधी । गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून ओढे- नाले पूर्णक्षमतेने भरून वाहू लागले आहेत. दरम्यान, कराड-पाटण तालुक्यातही दोन दिवसात पावसाने चांगली हजेरी लावली असून कराडजवळ असलेल्या कृष्णा नदीवरील (Krishna River) ब्रिटिशकालीन खोडशी धरण (Khodshi Dam) पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ देखील वाढली आहे.
कृष्णा नदीवर १८६४ मध्ये बांधले धरण महाराष्ट्रा त कालव्यांचा विकास सुमारे १५० वर्षांपूर्वी सुरू झाला. जलसिंचनासाठी ब्रिटिशांनी कृष्णा नदीवर १८६४ मध्ये कराड नजीकच्या खोडशी येथे धरण बांधल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात अनेक कालवे बांधले गेले. नंतर सिंचन क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली.
दमदार पावसामुळे कराडजवळचे ब्रिटिशकालीन खोडशी धरण ओव्हरफ्लो pic.twitter.com/9qTWiZyBQr
— santosh gurav (@santosh29590931) June 9, 2024
कालांतराने धरणांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले. खोडशी धरणातील पाण्याचा ९४०० हेक्टर क्षेत्राला लाभ खोडशी धरणात एकूण २.७० टीएमसी पाणीसाठा होतो. त्यापैकी १.५० टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यासाठी तर १.२० टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला दिले जाते. खोडशी धरणातून सांगली जिल्ह्यात पाणी नेण्यासाठी कृष्णा कालव्याची निर्मिती करण्यात आली. खोडशी येथून निघालेला कृष्णा कालवा ८६ कि.मी. लांबीचा असून, तो सातारा, सांगली जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस, तासगाव या तालुक्यातील ४५ गावातील सुमारे ९४०० हेक्टर क्षेत्र या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येते.