कराड प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस झाले सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या गावालगत असलेल्या शिंदी ते आरवला या दोन गावांना जोडणारा पूल कोसळून अपघात झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. या अपघातात 3 ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खेड येथे दाखल करण्यात आले. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला कळवा येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणाच्या जलाशया शेजारील सातारा जिल्ह्यातील शिंदी, वलवण, आरव, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, अकल्पे, गाढवली आदी गावे येतात. पावसाळ्यात यातील काही गावांचा संपर्कही तुटतो. विशेष म्हणजे या गावांतीळ काही लोक खेडला बाजार करण्यासाठी जातात. त्याला जोडणारा रघुवीर घाट ही असुरक्षित असता बनला आहे. कोयना या दुर्गम विभागातील शिंदी ते मोरणी हा 14 किलोमीटरचा रस्ता गेली 35 वर्षापासून वनविभागाच्या आडमुठे धोरनामुळे दुर्दैवाचे फेऱ्यात अडकला आहे.
शिंदी ते मोरणीला जोडणारा नदीवरील लोखंडी पूल गेली दहा वर्षापूर्वी पडला असून याची दुरुस्ती न झाल्याने ही गावे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. प्रशासनाने या गावातील लोकांसाठी बोट दिली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांकडून शिंदी ते आरवला या दोन गावांना जोडणारा पुल तयार करून द्यावा अशी मागणी केली जात होती. मात्र, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने काल येथील ग्रामस्थांनी चक्क स्वखर्चाने हा पूल बांधण्याचा निर्णय घेतला.
आणि पूल उभारण्याच्या कामास सुरुवात देखील केली. मात्र, कामावेळी अचानक हा पूल कोसळला आणि ग्रामस्थ या पुलाखाली सापडले. या दुर्घटनेत रामचंद्र नाना शिंदे, आणाजी बर्गे आणि विनोद जयसिंग मोरे हे तिघे ग्रामस्थ गंभीर जखमी झाले असून त्यांना इतर ग्रामस्थांनी प्रथोमोपचारासाठी खेड येथे नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईला कळवा येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.