सातारा प्रतिनिधी | वधू पक्षाच्या खोलीतून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना बुधवारी (दि. २० मार्च) बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. चोवीस तासात बोरगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेतलं. दागिने चोरल्याची कबुली संशयित महिलेने दिली आहे.
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील कोहीनुर मल्टीपर्पज हॉलमध्ये बुधवारी लग्नकार्य होतं. सर्वजण लग्नाच्या धामधुमीत असताना वधू पक्षाच्या खोलीमधून सोन्याचा हार, सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याची ठूसी, असे सुमारे 5 ताळे 3 ग्रॅम वजनाचे 3 लाख 54 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी या गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेतला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना सूचना देवून तपास सुरु केला. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार वधू व वधूच्या मैत्रिणींचा मेकअप करण्यासाठी आलेल्या मेकअप आर्टीस्ट महिलेवर पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी संशयित महिलेकडे कौशल्याने तपास केला असता मेकअप आर्टीस्ट महिलेने दागिने चोरल्याची कबूली दिली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी महिलेकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला. या तपासात पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांचे मार्गदर्शन लाभले .
बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, पोलीस हवालदार दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस नाईक दीपककुमार मांडवे, केतन जाधव, विशाल जाधव, महिला पोलीस प्रियांका पवार, नम्रता जाधव, मोनिका निंबाळकर यांनी ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे स्वत: या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.