साताऱ्यातील साडीच्या दुकानावर दरोडा टाकून दहशतवाद्यांनी खरेदी केले होते बॉम्ब तयार करण्याचे साहित्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | गेल्या वर्षी इस्लामिक स्टेट (आयएस) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरवर दरोडा टाकून लुटलेल्या एक लाख रुपयांतून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (वय ३१, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी उर्फ छोटू (वय २४, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरमध्ये ८ एप्रिल २०२३ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही लुटमारीची घटना घडली होती. या दुकानाचे व्यापारी रात्री दुकान बंद करत असताना अचानक दोघेजण दुकानात शिरले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानाच्या गल्ल्यातून तीन दिवसांत जमा झालेली एक लाख रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेनंतर या विक्रेत्याने सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दरम्यान, कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरताना तिघांना पकडले होते. हे तिघे संशयित दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर या
गुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आला होता. दरम्यान याच दहशतवाद्यांनी साताऱ्यातील व्यापाऱ्याला लुटल्याचे ‘एटीएस’च्या तपासात
निष्पन्न झाले आहे. या तीनही आरोपींविरोधात बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यासह (यूएपीए) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.