सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील बामणोली भागातील आपटी गावचे रहिवासी कृष्णा धोंडीबा कदम (वय ४३) हे कोयना जलाशयात शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास होडीतून पाण्यात पडले होते. त्यानंतर शोधकार्य सुरू होते. दरम्यान, तब्बल पाच दिवसांनी त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी ते बुडाला होते तेथेच जवळपास पाण्यावर तरंगताना मंगळवारी आढळून आला.
सकाळी सातच्या सुमारास काठावर मृतदेह आढळल्यानंतर आपटीचे पोलिस पाटील शामराव गायकवाड यांनी मेढा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी कर्मचारी पाठवत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेढ्याला पाठवला.
गेल्या चार दिवसांपासून ग्रामस्थ, महाबळेश्वर ट्रेकर्स जलाशयात त्यांचा शोध घेत होते; पण त्यात यश येत नसल्याने शोधकार्य थंडावले होते. त्यानंतर आज नैसर्गिकरीत्या मृतदेह वरती आला. घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास बामणोली बीटचे सहायक पोलिस फौजदार अनिल भिसे त्यांचे सहकारी धीरज बेसके करीत आहेत.