सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील खानापूर येथील धोम धरणाच्या डाव्या कालव्यात बुडून दोन चुलत भावांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी अथर्व गोरख माने (वय १२) याचा काल मृतदेह सापडला होता. तर अर्नव अमोल माने (वय ८) याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खानापूरमध्ये सापडला.
याबाबत अधिक माहिती, की माने कुटुंब हे मुंबईत वास्तव्यास असून, त्यांनी खानापूर येथे नव्याने बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीसाठी आले होते. काल दुपारी ही दोन्ही मुले खेळत होती. घरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या धोम धरणाच्या कालव्याच्या जवळ ती गेली असताना पाय घसरून पडली. त्यापैकी अथर्वला बुडताना काही ग्रामस्थांनी पाहिले.
त्याला कालव्यातून बाहेर काढले होते; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, तर अर्णव हा बेपत्ता झाला होता. काल रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली. आज सकाळी पुन्हा पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता, अथर्व बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे १०० मीटर अंतरावर अर्णवचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, हवालदार राजाराम माने, हवालदार दगडे करीत आहेत.