सातारा प्रतिनिधी | केळवली धबधब्यात तरूण बुडाल्याची घटना ताजी असतानाच महाबळेश्वर तालुक्यात वृध्द ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची आणखी एक घटना मंगळवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी संबंधितांचा शोध घेतला जात होता. आज बुधवारी वाहून गेलेल्या वृद्धाचा शोध घेण्यात ट्रेकर्सच्या पथकास यश आले.
बबन पांडुरंग कदम (वय ६२, रा. घावरी, ता. महाबळेश्वर) असे वृद्धाचे नाव आहे. जिल्हयाच्या पश्चिम भागात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. जनावरांना चरण्यासाठी घेवून गेलेला वृध्द मंगळवारी ओढ्याच्या पुरातून वाहून गेला. याची माहिती ट्रेकर्सना समजताच ट्रेकर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली. ट्रेकर्सच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पावसामुळे सायंकाळी शोध मोहीम थांबविण्यात आली होती.
बुधवारी सकाळी पुन्हा ट्रेकर्सच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी शोध घेत असताना वृद्धाचा मृतदेह ओढ्यातील झुडुपात अडकल्याचे आढळून आले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.