सातारा प्रतिनिधी | वेण्णा नदीपात्रात विजेच्या तारेला शॉक लागून बुडालेल्या सिद्धेश जवळ याचा मृतदेह सापडला असून मेढा परिसर हळहळून गेला. दरम्यान, मृत सिद्धेशला पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
सिद्धेश जवळ हा आपल्या 4 ते 5 सवगंड्यांसह कण्हेर जलाशयातील मेढा-मोहाट पुलाजवळ वेण्णा नदीत पात्रात पोहण्यासाठी सोमवारी सकाळी 7 वा. गेला होता. पोहत असताना नदी पात्रात जवळूनच विजेच्या तारेचा विद्यूत प्रवाह गेला होता. त्या विद्युत तारेचा सिद्धेशला शॉक बसला. नदी पात्रात जोराचा धक्का बसल्याने तो त्या झटक्याने नदीत बुडू लागला. बरोबर असणार्या सहकार्यांनी आरडा ओरडा करून त्याला वाचवण्यासाठी खुप मदत मागितली.
परंतु, पुलापासून युवक बुडाल्याचे अंतर जास्त असल्याने कोणीही शोधण्याचे धाडस केले नाही. अखेर शोधकार्यासाठी महाबळेश्वरचे ट्रेकर्सचे जवान दाखल झाले. त्यांनी बराच काळ लाँचच्या सहाय्याने शोध घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला मात्र रात्री उशिरापर्यंत यश आले नाही.
सोमवारी दिवसभर महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी आपल्या जीवाची बाजी लावून शोध घेतला, तरीही यश आले नव्हते. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरू झाला. त्यावेळी सकाळी 8.30च्या दरम्यान सिध्देशचा फुगलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यामुळे जवळवाडी ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. सिध्देशचा मृतदेह स्थानिक नागरिकांनी होडीतून बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.
त्यामध्ये सिद्धेशचा मृत्यू शॉक बसल्याने झाल्याचे समोर आले. दरम्यान, विद्युत वितरण कंपनीचे वाईचे कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे यांनी संबधित कुटुंबीयांची दिलगिरी व्यक्त करत त्यांना 25 हजार रुपये मदतीचा धनादेश दिला. चार लाखाचा विमा मंजुरीला पाठवला असून त्याची रक्कमही दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला विद्युत वितरणच्या वतीने देण्यात येणार आहे.