सातारा प्रतिनिधी । राज्यातील महत्वाच्या अशा असलेल्या पुणे – सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या सारोळा पुलावर मध्यभागी दुचाकी लावत नीरा नदीपात्रात एका युवकाने उडी मारल्याची घटना नुकतीच काही दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून युवकाचा शोध घेतला जात होता. दरम्यान संबंधित युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून उडी मारलेल्या युवकाचे नाव निलेश महादेव काकडे असे असून तो (वय 40, मूळ रा. ओगलेवाडी हजारमाची, ता. कराड, सध्या रा. जाधववाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) येथे राहत होता.
कराडच्या युवकाचा मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमच्या पथकाला आज चौथ्या दिवशी यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथे माथाडी कामगार म्हणून आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत असणारे नीलेश काकडे यांचा पत्नी पल्लवी काकडे हिच्याशी १ ऑगस्ट रोजी किरकोळ वाद झाला. त्यानंतर पत्नी पल्लवी ही मुलीसमवेत निघून गेल्याची फिर्याद पिंपरी चिंचवड येथील चिखली पोलिस ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी नीलेश काकडे यांनी दिली होती.
नीलेश काकडे तेव्हापासून मेहुणे प्रवीण लंगडे यांच्याकडे राहण्याकरिता म्हसवडला होते. दरम्यान, मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी नीलेश काकडे कंपनीमध्ये जाण्याकरिता दुचाकी (MH 50 – V 1347) वरून म्हसवड येथून पुणेकडे निघाले होते. यावेळी नीलेश काकडे यांनी सारोळा पुलावर पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या दिशेस आपली दुचाकी लावल्याचे निदर्शनास आले होते. नीलेश यांचा दूरध्वनी बंद असल्यामुळे प्रवीण लंगडे हेही शोध घेत होते.
दरम्यान, नीलेश यांनी सारोळा पुलावरून नीरा नदीपात्रात उडी मारल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच चौथ्या दिवशी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम आणि शिरवळ रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांना चौथ्या दिवशी यश आले. नीलेश यांचा मृतदेह आढळल्यानंतर शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशनला नोंद झाली असून, राजगड पोलिस ठाण्याला वर्ग केली आहे.