सातारा प्रतिनिधी । सातारा शहरा नजीक कास धरणापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जावळी तालुक्यातील फळणी गावच्या हद्दीतील झाडीत एका ३५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आज सकाळी आढळून आला. संबंधित तरुणाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झाला असून त्याचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार आहे.
संजय शेलार (वय ३५, रा. अंधारी, ता. जावळी), असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठार आणि धरणापासून काही अंतरावर फळणी हे गाव लागते. या गावच्या हद्दीत अंधारी बस स्टॉप आहे. या थांब्याच्या एस वळणाच्या खालील बाजूस असलेल्या झाडीत काही नागरिकांना गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह निदर्शनास आला.
माहिती मिळताच मेढा आणि सातारा तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जागेवरच पंचनामा केल्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. त्याच्या गळ्यावर काही खुणा दिसत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके कारण समोर येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.