कराड प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने काल शनिवारी मतदान, मतमोजणीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार देशात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन करत त्याची अंमलबजावणी करण्यास कालपासून कराड पालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली. काल कराड शहरात ठीकठिकाणी लावण्यात आलेले एकूण 30 फ्लेक्स कराड पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हटवण्यात आले. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील फलक हटवण्याचे तसेच राजकीय संघटना व पक्षांचे फलक देखील झाकण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले.
देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर कराड शहरात देखील पालिका प्रशासनाकडून आचार संहितेचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत शनिवारी शहरातील चौक तसेच विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या राजकीय पक्षांचे, नेत्यांचे फ्लेक्स हटवण्यात आले.
यावेळी कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने जप्त जप्त करत पुन्हा फलक न लावण्याच्या सुचना देखील करण्यात आल्या. शिवाय कराड शहरात अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्ष, संघटना आदींचे फलक झाकण्यात आले. दरम्यान, कराड शहरात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
30 फलक हटवण्यात आले : भालदार
कराड शहरात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांसह इतर पक्ष, संघटना आदींचे फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान, चोवीस तासांच्या आतमध्ये हे फलक काढून घेण्याच्या सुचना देखील करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने पालिकेकडून काल एकूण 30 फलक हटवण्यात आले. तर आज देखील फलक हटवण्याची कारवाई सुरू ठेवण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे अधिकारी आर. डी. भालदार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.