सातारा प्रतिनिधी | लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या आंधळी (ता. माण) येथील धरणात आलेल्या पाण्याचे पूजन उद्या बुधवारी (दि. 21) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तेथे जाहीर सभा होणार आहे. आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
पाणीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी धरणात 150 फुटांचा रॅम्प आणि त्यावर आकर्षक मंडप उभारण्यात आला आहे. भव्य व्यासपीठ तयार करण्यात येत असल्याने तालुक्यात कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आ. जयकुमार गोरे यांनी गेली 14 वर्षे अथक प्रयत्न करून, जिहे-कठापूर योजनेची रखडलेली कामे मार्गी लावली आहेत. अनेक अडचणींवर मात करून, या योजनेचे पाणी प्रथम एका नलिकेतून प्रथम खटाव तालुक्यातील नेर धरणात आणि आता साडेबारा किमी लांबीच्या आंधळी बोगद्यातून माण तालुक्यात आणले आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माण तालुक्यात जिहे-कठापूर योजनेचे पाणी येत आहे. या पाण्यामुळे आंधळी धरण भरून, पुढे माणगंगा नदी वाहती करण्यात येणार आहे. नदीवरील 17 बंधारे भरण्यात येणार आहेत. माणच्या उत्तर भागातील 32 गावांना आंधळी धरणातून पाणी देण्यासाठी आ. गोरे यांनी प्रस्तावित केलेल्या विस्तारीत योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत.